November 3, 2008

कणा

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

2 comments:

Tejas Shreesh Burse said...

nice one i remembered it your blog is very nice

Anonymous said...

nice blog yaarrrrrrrrr